गुहागरमध्ये भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासोमर निलेश राणेंचा ताफा आला होता. यावेळी निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे समर्थक आमने सामने आले.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर गुहागर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या.
भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघातील तळी येथे सायंकाळी 5 वाजता निलेश राणेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणेंनी गुहागरमध्ये सभेचे आयोजन केले आहे. तर या सभेपूर्वी निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.