लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरू झाले आहे.
भाजपच्या या राष्ट्रीय परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले. जेपी नड्डा ह्या भारत मंडपम येथे होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत देशभरातील सुमारे साडेअकरा हजार प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत.
तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या 10 वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राजनाथ सिंह यांच्यासह अकरा हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये पंचायत प्रमुखांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. परिषदेच्या बैठकीत दोन ठराव पारित करण्यात येणार आहेत. यासह लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पार करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रस्तावात राजकीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, विशेषत: मोदींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर भर दिला जाईल, तर दुसरा प्रस्ताव अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कृतज्ञता संदर्भात असेल.
या अधिवेशनात केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य, विद्यमान व माजी खासदार, आमदार, विधान परिषदेचे सदस्य, माजी प्रदेशाध्यक्ष, समन्वयक यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग असणार आहे. लोकसभा क्लस्टर्स, महापौर, महानगरपालिका आणि नगरपालिकांचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, विविध आघाड्यांचे राज्य समन्वयक, मीडिया, आणि सोशल मीडिया आणि आयटी सेल समन्वयक असे सर्वजण या अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 हुन जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामगिरीबाबत तसेच विशेषत: गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल तसेच 11,000 हून अधिक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीसाठीची कार्यपद्धतीचे नियोजन करण्यात येईल.