गेल्या काही दिवसात काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्स अकाऊंटवरून (ट्विटर)वरुन काँग्रेस पक्षाचे नाव काढल्यामुळे या वृत्ताला आणखी बळ मिळाले आहे.
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर ऐन लोकसभा निवडणुकीआधी हा काँग्रेसला मोठा फटका असेल.
कमलनाथ यांच्यासोबत दहा आमदार आणि तीन महापौरही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.तसेच कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा खासदार नकुलनाथही भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता आहे.
दरम्यान मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनी कमलनाथ यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्यप्रदेशमधील कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचे स्वागत आहे.
कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवाडाच्या पाच दिवसांचा दौरा करणार होते. पण, त्यांनी तो रद्द करुन अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.अशी बातमी समोर येत आहे मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. या दोन्ही नेत्यांना लगेच राज्यसभेची संधी मिळालेलीही दिसून आली आहे.
दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या काँग्रेस सोडण्याबाबतच्या बातमीचे खंडन केले आहे. कमलनाथ यांच्याशी माझं कालच बोलणे झाले असून आहे. ते छिंदवाडामध्ये आहेत. ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत. ज्या व्यक्तीने नेहरु कुटुंबियांसोबत काम केले आहे. ते असे कधीच करू शकत नाहीत असे ते म्हणाले आहेत.