१९ तारखेला येत्या सोमवारी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्त व पर्यटकांसाठी किल्ले शिवनेरी सज्ज झाला आहे.
गडाच्या पायथ्यापासून ते शिवजन्मस्थळापर्यंत संपूर्ण परिसराची स्वच्छता पूर्ण झाली आहे येणाऱ्या शिवभक्तांची संख्या विचारात घेता शिवभक्तांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनविभागाद्वारे केली आहे. गडावर बगीचा नंबर एक, शिवाई देवी, अंबरखाना व शिवकुंज या प्रत्येक ठिकाणी १३०० लिटर क्षमतेचे आरओ फिल्टर बसवण्यात आले आहेत.यावेळी शिवनेरीवर अकराशे पोलीस आणि होमगार्ड्सचा बंदोबस्त तैनात असणार आहे, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साडेनऊ वाजता शिवनेरी गडावरील शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमास सुरुवात होते. मात्र, यावेळेस हा कार्यक्रम लवकर सुरु करण्यासाठी आणि साडेनऊ वाजता संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम संपला की लोकांना दहा वाजल्यापासून गडावर सोडण्यात येईल. लोकांना विनंती आहे की दहा वाजल्यानंतर शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गडावरील शिवजयंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते.मात्र यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. दरवर्षी या सभेचे ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडं होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागानं परवानगी दिल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे दोन दिवस जुन्नर येथे स्वत: सर्व व्यवस्था पाहण्यासाठी हजर आहेत. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, म्हणून ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवजयंती उत्साहात साजरी करत असतानाच येणाऱ्या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
दरम्यान या प्रसंगाचे महत्त्व आणि पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने या ऐतिहासिक स्थळावर ये-जा करण्याचा प्रवास शक्य तितका सुरळीत व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. 17 ते 19 फेब्रुवारी 202असे तीन दिवस पीएमपीएमएलने भोसरी ते जुन्नर दरम्यान भाविकांची ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.