कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे . यांना खोके पुरत नाहीत, यांना कंटेनर लागतात. त्याचा मी साक्षीदार आहे,असे म्हणत त्यांनी टीकास्त्र डागले आहे.खुलासा करत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “धनुष्यबाण आपल्याला मिळाल्यानंतर त्यांचे एक पत्र आलं. आम्हाला पक्षाच्या खात्यातील ५० कोटी हवेत. मी क्षणाचाही विचार न करता देऊन टाका म्हटले . ५० खोकेंचे आरोप करता आणि ५० कोटी मागता? यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. “
तसेच २०१९ च्या महाविकास आघाडीचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंनी खडे बोल सुनावले., “संसार दुसऱ्याबरोबर आणि हनिमून तिसऱ्याबरोबर साजरा केलात. मी असंसदीय बोलत नाही. पण तुम्ही जनतेला आणि शिवसैनिकांना फसवले पंतप्रधान मोदींची फसवणूक केली. महाराष्ट्राची फसवणूक केली. एका खुर्चीच्या मोहापायी तुम्ही सगळं गमावले तेव्हा बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा पाहिला पाहिजे. स्वतःची कर्तृत्व आरशात बघावीत. काहीही लपून राहात नाही. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केली आहे.त्यांच्यामागे जनता उभी राहते. आज जी काही गर्दी झाली आहे त्यावरून हे कळेलच आणि आता शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही”.
आपल्या भाषणादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, “उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेल. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतो, असेही एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले आहेत”.
“आयत्या पिठावर रेघोट्याही नीट मारता आल्या तुम्हाला, मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केले . कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे असतील त्यांनी काय मागितले होते पण तुम्हाला यांचा त्रास होता”, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.