पिंपरी-चिंचवडमहापालिकेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक वर्षामुळे सलग तिसऱ्या वर्षी करवाढ, दरवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार असून, प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आहे.
प्रशासकांकडून कोणते नवीन प्रकल्प, कोणत्या घोषणा केल्या जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एके काळी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असा लौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती खालावू लागली आहे. महसुलाचे नवे मोठे स्रोत उभे करण्यात अपयश आल्यामुळे महापालिकेची अवस्था डबघाईला येत असल्याचे कर्ज घेण्यावरून दिसते. मालमत्ताकरच उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. बांधकाम परवानगीतून मिळणारे उत्पन्न कायमस्वरूपी नाही. महापालिकेच्या ठेवी नेमक्या किती आहेत, याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची नेमकी माहिती मिळत नाही. दुसरीकडे प्रशासनाने विविध विकासकामांसाठी कर्ज काढण्याची भूमिका घेतली आहे.
नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारले आहे. आता रस्त्यांचे सुशोभीकरण, रुग्णालयाच्या उभारणीसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज काढले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज या अर्थसंकल्पातून येण्याची शक्यता आहे.