पुणे, दि. १७ फेब्रुवारी : पुण्यातील सहकारनगर येथील श्री योगी अरविंद मंच यांच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारीपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून दिनांक २३, २४ आणि २५ फेब्रुवारी हे तीन दिवस रोज संध्याकाळी ६ वाजता नामवंत मंडळींचे विचार ह्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ऐकायची संधी नागरिकांना मिळणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष डॉ. जगदीश करमळकर यांनी दिली.
सहकारनगर क्रमांक दोनमधील प्रताप सोसायटीतील श्री योगी अरविंद सांस्कृतिक मंचाच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी ‘शिवराज्याभिषेक वर्ष ३५०’ या विषयावर इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे व्याख्यान होणार आहे, तर शनिवार रोजी ‘विश्वपटलावरील भारताचे स्थान’ या विषयावर अर्थक्रांती ट्रस्टचे राष्ट्रीय प्रवक्ते दिपक करंजीकर यांचे विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. तर रविवारी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीचे अखिल भारतीय संयोजक रवींद्र जोशी यांच्या ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
श्री योगी अरविंद सांस्कृतिक मंचाची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली असून अनेक समाजपयोगी उपक्रम या मंचाच्या वतीने राबवण्यात येतात.
परिसरातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार, १० वी आणि १२ वीच्या मुलांचा कौतुक समारंभ, पुण्याबाहेरील यूपीएसी, एमपीएससीचे विद्यार्थी तसेच वस्ती विभाग मुलांसाठी अभ्यासिका जेष्ठ नागरिक सल्ला केंद्र, दिव्यांग मुलांसाठीचे फनक्राफ्ट सेंटर, चेतना प्रकल्प आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा अश्या विविध उप्रक्रमाचे आयोजन केले जाते.