उर्दू कवी आणि अनेक सुमधूर चित्रपट गीतांची रचना करणारे गीतकार गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ निवड समितीने आज ही घोषणा केली.
१९४४ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय ज्ञानपीठाकडून भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.गुलजार यांना उर्दू भाषेतील योगदानासाठी तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेतील योगदानासाठी देण्यात येणार आहे.
गुलजार यांनी 1963 मध्ये बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांच्या कवितांनी हिंदी संगीत विश्वात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. जगातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्काराने गुलजार यांना सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी सिनेमांमध्ये त्यांचे मोठे योगदान असून ते आताच्या काळातील सर्वांच्या मनावर राज्य करणारे उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात.
चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते आहेत. रामभद्राचार्य यांनी 100 हून पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.तसेच त्यांना २२ भाषांचे ज्ञान आहे.
जन्म झाल्यावर दोन महिन्यांत जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी दृष्टी गमावली होती जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. पंडित रामभद्राचार्य हे एक शिक्षक, संस्कृत विद्वान, तत्वज्ञानी, लेखक, संगीतकार, गायक, नाटककार, आहेत.
यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत भाषेसाठी दुसऱ्यांदा तर उर्दूसाठी पाचव्यांदा दिला जात आहे. सर्वोच्च साहित्यिक सन्मान असणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांना ११ लाख रुपयांचे पारितोषिक, वाग्देवीची मूर्ती आणि सन्मानपत्र दिले जाते.