देशासह महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. एका बाजूला देशामध्ये थंडीची लाट असतानाच आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ४८ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंदीगड, लडाख या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता देण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात हा अंदाज देण्यात आला आहे. तर कोकण भाग सोडल्यास राज्यात तुरळक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची तसेच मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाखमध्ये देखील भारतीय हवामान विभागाने बर्फवृष्टी आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याने पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये धुक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उत्तर भारतात असलेली थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे.