यावर्षी देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. मार्च महिन्यात लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. भाजपाने अब कि बार ४०० पार तर, विरोधकांनी मोदी सर्कारकला पराभूत करण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जागतिक स्तरावर झालेला भारताचा विकास, गरीब समाजासाठी केलेलं कार्य या भोवती यंदाचा लोकसभेचा प्रचार होईल हवा. भाजपाने ३७० जागा जिंकणे हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दरजा देणारी ३७० कलमाचा विरोध श्म्याप्रसाद मुखर्जी यांनी केला होता. हे ३७० कलम २०१९ मध्ये केंद्र सरकारने रद्द केले.
प्रत्येक बूथ कार्यकर्त्याने आता मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाला किमान ३७० मते जास्त मिळतील यासाठी काम करावे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींच्या संबोधनाबाबत माध्यमांना माहिती देताना भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की, विरोधक निवडणुकीदरम्यान, ‘अनावश्यक आणि भावनिक मुद्दे’ उपस्थित करण्याचा प्रयत्न करतील. मात्र पक्षातील सदस्यांनी विकास, गरीब समाजासाठी राबविलेल्या योजना, धोरणे या मुद्द्यांवर प्रचार केला पाहिजे. भारतीय जनता पक्ष २५ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियान सुरु करणार असल्याचे विनोद तावडे म्हणाले.