अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबाच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. मुलीच्या अंगात सैतान आहे, तो बाहेर काढावा लागेल असे सांगून त्या मुलीला धर्मस्थळी बोलावून तिच्यावर अत्याचार केले जात असल्याची भयावह घटना समोर आली आहे. हे अत्याचार गेले एक महिना होत असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. या अत्याचाराबद्दल कोणाला सांगितल्यास तुमची आई व आजी मारून जाईल अशी भीती त्या मुलीला दाखवण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांमुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता ३७६,३५४ आणि ३४ या कलमांतर्गत पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून, याप्रकारे जे कोणी पीडित आहेत त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या प्रकारचा तपास अहमदनगर पोलीस करत आहेत.
या प्रकरणानंतर सोनई गावात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरुद्ध सोनई गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. घटना घडलेल्या धार्मिक स्थळावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या आरोपींविरुद्धचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोरात शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.