फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर हे 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत, त्यांच्यासोबत पाच सिनेटर्सच्या शिष्टमंडळही असणार आहे अशी माहिती भारतातील फ्रेंच दूतावासाने दिली आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य मजबूत करणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश असणार आहे.
“लार्चर यांच्यासोबत पाच इतर सिनेटर्सचे शिष्टमंडळ असणार आहे जे सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीचे किंवा फ्रान्स-भारत मैत्री गटाचे सदस्य आहेत. तसेच फ्रेंच सिनेटच्या अध्यक्षांची ही पहिली अधिकृत भारत भेट असणार आहे.
‘लार्चर आणि त्यांचे शिष्टमंडळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत.’तसेच फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतील, या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांबाबत विस्ताराने चर्चा केली जाईल.
‘फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष आणि त्यांचे सिनेटर्स फ्रेंच सिनेट आणि भारताच्या संसदेदरम्यान सहकार्य आणि परस्पर संबंध वाढवण्याच्या मुद्दयांवर चर्चा करतील. लार्चर हे संसदेच्या नवीन इमारतीलाही भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, लार्चर भारतात उपस्थित असलेल्या फ्रेंच कंपन्यांच्या व्यावसायिक नेत्यांची भेट घेतील, विशेषतः एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील आणि “मेक इन इंडिया” आणि “स्किल इंडिया” मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या फ्रेंच कंपन्यांच्या साइट्सना भेट देतील.
लार्चर यांनी यापूर्वी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसच्या नंतरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती, तेव्हा लार्चर आणि सर्व प्रमुख संसदीय गटांच्या नेत्यांनी फ्रेंच सिनेटमध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले होते.