आज विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक सादर करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विधानसभेत एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
विधानसभेत आवाजी मतदानाने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, टिकणारा आणि धाडसी आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेला संबोधित करताना म्हटले की, मी दिलेला शब्द पाळतो. मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून आम्ही वचनाची पूर्तता केली आहे. हा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचा विजय आहे. तसेच हा मराठा सामाजाचा, ऐक्याचा आणि चिकाटीने दिलेल्या लढ्याचा विजय आहे. मराठा समाजाच्या इच्छापुर्तीचा हा दिवस आहे. लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना शिस्त मोडली नाही, संयम सोडलेला नाही. त्याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे आभार व्यक्त करतो.
समस्त राज्याला आणि ओबीसींना मी सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. एका जातीचा किंवा धर्माचा मला विचार करता येत नाही. त्यामुळे मी मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.