महाराष्ट्र राज्याच्या विधानसभे मराठा समाजाचे आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या विधेयकावर प्रस्ताव सादर केला. त्यावर हे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण देत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाचे स्वागत केले आहे. मात्र सगेसोयरेच्या अंमलबजावणी केली नाही यासाठी ते आता आक्रमक झाले आहेत. आम्ही सगेसोयरे यावर ठाम आहोत असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ”सरकारने दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करतो. मात्र आम्ही सगेसोयरे यावर ठाम आहोत. उद्या १२ वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान ही बैठक निर्णायक असणार आहे. उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. आमची मागणी एक दिले दुसरेच. उद्या मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीमध्ये यावे.”
दरम्यान, विधानसभेत आवाजी मतदानाने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, टिकणारा आणि धाडसी आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
समस्त राज्याला आणि ओबीसींना मी सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. एका जातीचा किंवा धर्माचा मला विचार करता येत नाही. त्यामुळे मी मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती, असे एकनाथ शिंदे म्हणाले.