विधानसभेत आवाजी मतदानाने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, टिकणारा आणि धाडसी आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे सभागृहात आक्रमक झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात हल्लाबोल केला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मला मराठा आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण मनोज जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल आयुक्त, कलेक्टर, एसपी यांना आईवरून शिव्या देण्यात आल्या. त्यांची ही दादागिरी चालली आहे, त्यांना अटकाव करणार आहात की नाही? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, जरांगेंना 27 तारखेला गुलाल उधळला, फटाके वाजवले. त्यानंतर 10 तारखेला ते पुन्हा उपोषणाला बसले. राज्यात ते भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. अनेक शहरात बसगाड्या फोडण्यात आल्या आहेत. हे सर्व थांबायला पाहिजे.
हे सगळं झाल्यानंतरही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. ते म्हणतात मी उपोषणावरून उठणार नाही. आपण मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा ठराव केला तरीही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यात आपण काहीही बोललो की हे धमकी देणार. आता तर त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीत आरक्षण द्या. ही जरांगेंची दादागिरी आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.