विधानसभेत आज मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, टिकणारा आणि धाडसी आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले याचा आम्हाला आनंद आहे. पण मराठा समाजाने जागरूक राहावे, कारण सरकारकडून तोंडाला पाणी पुसण्याचे काम सुरू आहे.
तमिळनाडूत राज्य सरकारने अशाच प्रकारचे आरक्षण दिले होते आणि आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचे पुढे काहीही झाले नाही. राज्य सरकारला हे अधिकार आहेत का? ही केंद्राची गोष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या निर्णयाची. मागेही मी सांगितले होते की, हा विषय टेक्निकल आहे, त्यामुळे उगाच सरकारने जाहीर केले म्हणून आनंद मानण्यासारखे काहीही नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
सरकारला विचारले पाहिजे की, तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले म्हणजे नेमके काय दिले? या गोष्टींचे तुम्हाला अधिकार आहेत का? यानंतर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार. मग राज्य सरकार सांगणार सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या, याला काही अर्थ आहे का? असेही राज ठाकरे म्हणाले.