आज विधानसभेत मराठा समाजाचे आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या विधेयकावर प्रस्ताव सादर केला. त्यावर हे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण देत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर आता मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. पण, हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा तीव्र उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा तीव्र उपोषणाला सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी उपचार घेणे देखील थांबवले असून उद्या अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने मराठ्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मनोज जरांगेंनी सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय न झाल्याने पुन्हा उपोषण करायचे ठरवले आहे. यावेळी जरांगे म्हणाले की, आज जो कायदा मंजूर झाला तो गोरगरीब मराठ्यांमुळे मंजूर झाला आहे. असे असले तरी आम्ही या आरक्षणाची मागणी केलेली नाही. पण तरीही आज दिलेले हे आरक्षण कोर्टात टिकले नाही तर सरकारला मराठ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.
आज सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे होता. आम्ही ज्या मागणीसाठी उठावच केला नव्हता ती मागणी मान्य केली आहे. आजच्या आरक्षणाची ज्यांना गरज होती त्यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतला. पण त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही, हे यातून दिसून येत आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.