पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ३२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्रासह अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हे प्रकल्प आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, पेट्रोलियम आणि नागरी पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. यावेळी नागरिकांना संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
घराणेशाहीच्या राजकारणात अडकलेल्या राजकीय पक्षांना फक्त स्वतःच्या हिताची काळजी असल्याची टीका त्यांनी केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”जम्मू आणि काश्मीरला कित्येक वर्षे घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका सहन करावा लागला. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांची चिंता आहे. तुमच्या हिताची नाही. तुमच्या कुटुंबांना आणि या भागातील तरुणांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मला आनंद आहे की , जम्मू काश्मीरला या घराणेशाहीपासून सुटका मिळत आहे.”
२०१९ मध्ये रद्द करण्यात आलेले कलम ३७० हे जम्मू आणि काश्मीरच्या विकासातील सर्वात मोठा ‘रोडब्लॉक’ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, केंद्रशासित प्रदेश आता सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहे. ”कलम ३७० जम्मू काश्मीरच्या विकासातील सर्वात मोठी अडचण होती. मात्र भाजपा सरकारने ते रद्द केले आहे. जम्मू-काश्मीर आता सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहे. ३७० कलम रद्द केल्यामुळेच मी लोकांना आवाहन करत आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३७० तर एनडीएला ४०० जागा जिंकण्यासाठी मदत करावी.”
”माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही विकसित जम्मू काश्मीर तयार करू. तुमची ७० वर्षांमधील स्वप्ने येत्या काही वर्षांत मी पूर्ण करेन. पूर्वी जम्मू-काश्मीरमधून बॉम्ब, अपहरण आणि वेगळे होण्याच्या निराशाजनक बातम्या येत होत्या, पण आता जम्मू-काश्मीर विकसित होत आहे आणि पुढे जात आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.