आज विधानसभेत मराठा समाजाचे आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या विधेयकावर प्रस्ताव सादर केला. त्यावर हे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर यावर ठाकरे गटाचे प्रमुख्य उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, त्यावरून हे विधेयक टिकेल अशी मला आशा आहे.
कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला असून त्यांच्यातील अनेकांना बलिदान द्यावे लागले आहे. तसेच हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिले आहे. याबाबत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर स्पष्ट होईल. पण तातडीने आता मराठा समाजातील किती तरूणांना नोकरी मिळणार हे सरकारने सांगितले तर सोन्याहून पिवळे होईल. तसेच दोन मते असती तर आम्ही एकमत दिले नसते. मुख्यमंत्री काय आणि कसे आहेत याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवर जनतेचा विश्वास नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मराठा समाजाला देखील धन्यवाद देऊ इच्छितो की, त्यांनी एवढा मोठा लढा दिला आहे. तसेच मला सरकारला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही हा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मी तुमच्या प्रामाणिकपणाबाबत आज शंका घेत नाही. पण त्याकरता मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.