महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत मराठा समाजाचे आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या विधेयकावर प्रस्ताव सादर केला. त्यावर हे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण देत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाचे स्वागत केले आहे. दरम्यान या निर्णयावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत ‘एक्स’ या सोशल मीडियावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.”
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाचे स्वागत केले आहे. मात्र सगेसोयरेच्या अंमलबजावणी केली नाही यासाठी ते आता आक्रमक झाले आहेत. आम्ही सगेसोयरे यावर ठाम आहोत असे जरांगे पाटील म्हणाले. ”सरकारने दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करतो. मात्र आम्ही सगेसोयरे यावर ठाम आहोत. उद्या १२ वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान ही बैठक निर्णायक असणार आहे. उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. आमची मागणी एक दिले दुसरेच. उद्या मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीमध्ये यावे.”