रेडिओ किंग, ज्येष्ठ सूत्रसंचालक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराच झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अमीन सयानी यांच्या निधनाबाबतची माहिती त्यांचा मुलगा राजिल सयानी यांनी दिली आहे. अमीन सयानी यांना गेल्या 12 वर्षांपासून पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. तसेच त्यांना उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक समस्यांनी ग्रासले होते.
अमीन सयानी रेडिओचा आवाज म्हणून ओळखले जायचे. त्यांचे विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ आणि रेडिओ सिलोन हे कार्यक्रम चांगलेच लोकप्रिय होते. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकजण नेहमी आतुर असायचे. विशेष म्हणजे अमीन सयानी यांनी जवळपास 19 हजार जिंगल्सला आवाज दिला आहे. तसेच त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली होती.
‘बहनों और भाइयों’ असे म्हणत संबोधित करण्याची अमीन सयानी यांची शैली खूप प्रसिद्ध होती. तसेच त्यांनी कत्ल, भूत बंगला, तीन देवियाँ यासारख्या चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणून काम केले होते.