आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ सूत्रसंचालक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी त्यांना गौरविण्यात आले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलाने दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जायचे. २२ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वृद्धापकाळाने अमीन सयानी यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. अमीन सयानी यांना रेडिओचा किंग म्हटले जायचे. प्रत्येक आठवड्याला त्यांचा आवाज ऐकण्यासाठी रेडिओप्रेमी आतुर असायचे. अमीन सयानी यांनी तब्बल कित्येक हजारांमध्ये जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली होती. गीतमाला या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले. या कार्यक्रमात सुरुवातीला केवळ ७ गाणी होती, नंतर त्यांची संख्या १६ इतकी करण्यात आली होती. रेडिओचा आवाज आणि रेडिओ किंग अशा उपाध्या मिळालेले अमीन सयानी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेर या जगाचा निरोप घेतला आहे.