कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोपमध्ये रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषणात रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला. येणाऱ्या काळात अजित पवार हे एकटे पडतील, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही स्थिती होईल, असेही रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये अजित पवार एकटेच पडतील. तसेच त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत ते देखील त्यांच्यासोबत राहतील कि नाही असा प्रश्न आहे. अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंची देखील तशीच स्थिती होईल. कारण भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवते.
हे पक्ष 2024 मध्ये राहतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तसेच येणाऱ्या काळात काही आमदार आमच्यासोबत येतील, असा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवला आहे.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया थांबाव्यात म्हणून भाजपसोबत गेले आहेत. त्यांना हळूहळू भाजप दबावात ठेवेल. भाजप विधानसभा निवडणुकीत तर त्यांना 10-20 जागाच देतील, अशा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावला.
आपल्याला बैलाकडे पाहून प्रामाणिक कसे राहावे हे कळते. जो मालक आपल्या बैलाला लहानाचा मोठा करतो तो बैल मालकाला कधीच विसरत नाही. तसेच आपण आपल्या आई-वडीलांना, गुरूला कधीच विसरत नाही. आपल्या काकांना आपण विसरत नाही. पण आजकाल लोक ते विसरत आहेत. पण जाऊद्या ज्यांना विसरायचे आहे त्यांना विसरू द्या. आपण संघर्ष करत राहुयात, असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.