अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी अमरावतीत नवनीत राणांना इशारा दिला होता. त्यावर आज खासदार नवनीत राणा यांनी जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असून, आता लवकरच त्यासाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. देशःसह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान आता नेत्यांमध्ये देखील एकमेकांना आव्हान देणे आणि निवडणुकीसाठी इशारा देणे असे काहीसे सुरु झाल्याचे दिसून येत आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या इशाऱ्याला खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ”या देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. संभाजीनगरला डाग लावणाऱ्या व्यक्तीचे एक वक्तव्य समोर आले. इम्तियाज जलील. ओवेसींचा चमचा. काय तर म्हणे, अमरावतीत येणार नवनीत राणांना हरविण्यासाठी. अरे तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. मी त्यावेळी देखील म्हणाले, या देशात राहायचे असेल तर, जय श्रीराम म्हणावे लागेल. तुमच्यात हिम्मत असेल तर अमरावतीत येऊन लढ आणि मला हरवून दाखव. नाही लढला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा जिंकतो तेच बघते. चेला आहे चेलाच राहणार. संभाजीनगरचे लोकं यावेळेस आमच्या संभाजी महाराजांना डाग लागू देणार नाहीत. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले नवनीत राणा तुम्हाला घाबरणारी नाहीये.”
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. तसेच त्यांचे पती रवी राणा देखील आमदार आहेत. दोन्ही अपक्ष निवडून आले आहेत. तसेच सध्या त्यांचा पाठिंबा महायुतीला आहे. मविआ सरकार असताना हनुमान चालीसा प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून की, अपक्ष म्हणून उभा राहतात ते पाहणे महत्वाचे असणार आहे.