पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसणार असलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे.
आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असून ही प्रणाली 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. अशा परिस्थितीत, केंद्रीय बोर्ड (CBSE, CISCE) तसेच विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये 2023-24 या वर्षात इयत्ता 8 वी आणि 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुक्रमे 10वी आणि 12वी च्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील.
सोमवारी (19 फेब्रुवारी 2024) छत्तीसगडमध्ये प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM SHRI) योजनेचा शुभारंभ करताना, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली की, वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधून घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील रायपूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना शिक्षण मंत्री म्हणाले की, एनईपीमध्ये विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यासोबतच, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी नवीन अभ्यासक्रम आराखडा (NCF) जाहीर केला होता, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांना चांगली कामगिरी करता यावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. बोर्डाच्या परीक्षेत दोनदा बसलेल्या विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी सर्वोत्तम गुण अंतिम म्हणून ठेवण्याची परवानगी असेल. शिक्षणमंत्र्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शासनाच्या या निर्णयावर आनंद आहे का, अशी विचारणा केली आणि केवळ उत्कृष्ट गुणांनाच अंतिम मानणार असल्याचे सांगितले.