सध्या देशासह राज्यात हवामानामध्ये बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी थंडीचे, उन्हाचे वातावरण दिसत आहे. आज देशासह महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी धुक्याची चादर दिसत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजबा, राजस्थानच्या काही भागात रिमझिम पावसाची शक्यता देण्यात आली आहे. काही ठिकाणी हवामान कोरडे राहू शकते.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागात बर्फवृष्टी होत आहे. उत्तर-पश्चिम भागात पुढील २ दिवस पाऊस आणि गारपीट होऊ शकते असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. आज हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे. राजधानी मुंबईच्या हवामानात बदल होण्याची शक्यता कमी आहे. राज्यात कोकण विभाग सोडून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.