मंगळवारी मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात एकमताने संमत झाले आहे. त्यानंतर आज (21 फेब्रुवारी) मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली आहे. 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच हे आंदोलन रोज असणार असल्याचेही ते म्हणाले.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, कुणबी आणि मराठा एकच आहे असा अध्यादेश काढा, राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशा मागण्या मनोज जरांगेंनी पु्न्हा एकदा केल्या आहेत. तसेच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी 2 दिवसांमध्ये करावी अन्यथा 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करू, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, आपल्याला प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. 24 तारखेपासून हे आंदोलन करायचे आहे. आपण फक्त आपले गाव सांभाळायचे आहे आणि कोणीही तालुक्यात जायचे नाही. पूर्ण गाव शक्तीने एकत्रित येतील. आपल्याला यांना जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावात आंदोलन करायचे आहे.
हे आंदोलन करताना कोणीही जाळपोळ करायची नाही. कारण मुलांच्या परीक्षा चालू आहेत. आपल्याला महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आहे. या आंदोलनाला आपल्याला सकाळी साडेदहा वाजता सुरूवात करायची आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन करायचे आहे. तसेच ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत आंदोलन करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे यापुढे हे आंदोलन रोज करायचे आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, बारावीची परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून आंदोलन करताना प्रत्येकाने काळजी घ्या. गरज पडली तर विद्यार्थ्यांना तुमच्या गाड्यांवर पेपरच्या स्थळी सोडून या. तसेच आता कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दारात जाऊ नका. आता कोणत्याही आमदार, खासदारांना किंमत देऊ नका. तसेच आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये. जर निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या आपल्या गोठ्यावर नेऊन सोडा. सोबतच 24 ते 29 पर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसायचे आहे, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली.