मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणात सहभागी असलेले महत्त्वाचे सदस्य, किर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील हा खोटारडा माणूस आहे, तो रोज पलटी मारतो, असे आरोप अजय बारसकर यांनी केले आहेत. बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर हल्लाबोल केला.
यावेळी अजय बारसरकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मी मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी अनेक वर्षांपासून काम करतोय. तसेच मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली तेव्हापासून मी आंदोलन लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो. मी यापूर्वी माध्यमांसमोर कधीच आलो नाही.
मी मनोज जरांगे पाटील यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेंकडे पाटील पदासाठी काहीही नाही. तो हेकेखोर असून कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज हा खूप भोळा समाज आहे. यापूर्वी मी सामाजिक विभागासोबत मनोज जरांगेंना मसुदा समजवायचो. त्यामुळे यापूर्वी त्यांना मी सगळे सांगत असताना महाराज साक्षी आहेत असे ते सांगत होते, असे आरोप अजय बारसकर यांनी केले.
पुढे ते म्हणाले, जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याच्या सर्व मिटिंग रात्री होत असतात. जेव्हा वाशीला आंदोलन पोहोचले होते त्या रात्री त्यांनी पुन्हा गुप्त मिटिंग केल्या होत्या. अधिसूचनेत सांगण्यात आले होते की, हे सोळा तारखेला लागू होईल. पण जरांगेची इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येऊन मला पाणी पाजावे. त्याला फक्त श्रेय हवे आहे. गरिबाला आरक्षण हवे आहे पण याला फक्त श्रेय आणि जेसीबीतून फुले हवी आहेत.
मनोज जरांगेंची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देवही पाया पडले. तुमच्या मुलांमध्येही इतका अहंकार? तुम्ही सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? तो माझ्यावर आरोप करतो की मी सरकार आणि भुजबळांचा माणूस आहे. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत त्याने सरकारला एकही पत्र स्वत: दिले नाही. रोज पलटी मारत असतो, असे आरोपही बारसकर यांनी केले आहेत.
जरांगेंच्या प्रत्येक कृतीला मी साक्षी आहे. मी प्रसिद्धी किंवा पैशांसाठी हे आरोप करतोय असे बिलकुल नाही. आत्ता मी हे आरोप का केले तर मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात असलेली खदखद व्यक्त केली आहे, असेही बारसकरांनी सांगितले.