आज ग्रीस देशाचे पंतप्रधान किरिकोस मित्सोटाकिस यांनी राष्ट्रपती भवनला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारतात येणे हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला एक दूरदर्शी नेते आणि खरे मित्र वाटतात असे ग्रीसचे पंतप्रधान किरिकोस मित्सोटाकिस म्हणाले. किरिकोस मित्सोटाकिस मंगळवारी रात्री उशिरा भारतात दाखल झाले. परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
तब्बल १६ वर्षानंतर ग्रीसचे पंतप्रधान हे भारत दौऱ्यावर आले आहेत. १६ वर्षांपूर्वी कोस्टास करमनलिस हे २००८ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान किरिकोस मित्सोटाकिस हे रायसिना संवादाचे चीफ स्पीकर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे उदघाटन करणार आहेत. ग्रीसच्या पंतप्रधानांनसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारतात आले आहे. यामध्ये बड्या उद्योगपतींचा देखील समावेश आहे.
”आम्ही इंडो-पॅसिफिकमध्ये ग्रीसच्या सक्रिय सहभागाचे आणि सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो. ग्रीसने इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला ही आनंदाची बाब आहे. आम्ही सहमत आहोत की सर्व वाद आणि तणाव संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवले जावेत संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सहकार्यातून आमचा परस्पर विश्वास दिसून येतो. या क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यगट तयार करण्यात आला आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ठ हे जागतिक स्तरावरील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे हा आहे. यामध्ये जवळजवळ १०० पेक्षा जास्त देशांचे परराष्ट्रमंत्री nसहभागी होतात. या वर्षी ग्रीसचे पंतप्रधान मुख्य पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरम्यान राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तसेच यावेळी ग्रीसचे पंतप्रधान यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली.