शंभू आणि खनौरी सीमेवर परिस्थिती गंभीर होत आहे. पंजाबचे 14 हजार शेतकरी 1200 ट्रॅक्टर-ट्रॉलींवर स्वार होऊन शंभू सीमेवरून राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी खनौरी सीमेवर देखील सुमारे 800 ट्रॅक्टर ट्रॉली आहेत. येथूनही शेतकरी हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांच्यावर ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.
आज सकाळी दोन्ही सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. दरम्यान, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही खास मास्क आणि गॉगल घातले होते.
त्याचवेळी केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण पाठवले आहे. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. भविष्यातही शेतकऱ्यांशी बोलण्याची आमची तयारी असल्याचे मुंडा म्हणाले.
आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा चर्चेला सहमती दर्शवली तर ही त्यांची सरकारसोबतची पाचवी बैठक असेल. आतापर्यंत झालेल्या चारही बैठका अनिर्णित ठरल्या आहेत. आज आंदोलनाचा 9वा दिवस आहे.