प्रसिद्ध गोल्डमॅन आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे निधन झाले आहे. दुपारी ऑफिसवरून घरी जात असताना पंढरीनाथ फडके यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने पनवेल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंढरीनाथ फडके यांची महाराष्ट्रभर ‘छकडा फेम’ म्हणून ओळख होती. त्यांना बैलगाडा शर्यतीची प्रचंड आवड होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे शर्यतीचे 40 हून अधिक बैल होते. तसेच महाराष्ट्रात जिथेही बैलगाडा शर्यत असेल तिथे पंढरीनाथ फडके उपस्थित असायचे. जिथे बैलगाडा शर्यत असेल तिथे पंढरीनाथ यांची धमाकेदार एन्ट्री व्हायची.
बैलगाडा शर्यतीवर सरकारने बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते. तसेच शर्यतीमध्ये जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग तो बैल कितीही किंमतीत विकत घ्यायला लागला तरी ते विकत घ्यायचे. विशेष सांगायचे झाले तर त्यांनी एकदा 11 लाख रूपये देऊन एक जिंकलेला बैल खरेदी केला होता.
बैलगाडा प्रेमी सोबतच पंढरीनाथ फडके यांची गोल्डमॅन म्हणून देखील ओळख होती. बैलगाडा शर्यतीत त्यांच्या सोन्याची आणि गा़डीच्या टपावर बसून शर्यत बघण्याची त्यांची स्टाईल चांगलीच चर्चेत असायची.