सध्या पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र दिल्लीच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरपीएफ, पॅरामिलिट्री फोर्सेस तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेची ५ वी फेरी पार पडणार होती. शेतकरी आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दाता सिंह-खानोरी सीमेवर शेतकरी व सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
दाता सिंह-खानोरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये चकमकीत एका शेतकऱ्याचा गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मात्र पोलिसांनी अशी घटना घडल्याचे वृत्त नाकारले आहे. या चकमकीत २० पेक्षा जास्त शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना अटक केल्याची बातमी समोर आली आहे. आंदोलक व पोलिसांमध्ये खूप चकमक सुरु होती.
अनेक शेतकरी शेतांमधून दिल्लीचा सीमा ओलांडू पाहत होते. त्यावर देखील पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समजते आहे. या चकमकीमध्ये मृत्यू पडलेले शेतकरी खनौरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून सतत अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज सुरू आहे. पोलिस आणि शेतकरी यांच्यात चकमक सुरूच आहे. सीमेवरील बॅरिकेड जेसीबीद्वारे हटविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.
आज शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पाचव्यांदा बैठक होणार आहे. त्यातून काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे आहे.विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबरोबर सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले. आम्ही संभाषण करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे प्रयत्न करत असून, आज सरकारने शेतकऱ्यांना चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी आमंत्रित केले आहे.