शेतकरी नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला दोन दिवसांचा मोर्चा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. शंभू सीमेवरील बैठकीत केंद्राच्या प्रस्तावावर शेतकरी विचार करत आहेत. तत्पूर्वी, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांची हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर पोलिसांशी चकमक झाली. आंदोलक शेतकऱ्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यावर हरियाणा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
यावेळी आंदोलक शुभ करण सिंह जखमी झाला होता. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, तर पोलिसांनी याचा विरोध केला आहे. आंदोलकांशी झालेल्या चकमकीत एक शेतकरी आणि दोन पोलिस जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुझफ्फरनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिकांना किमान आधारभूत किंमत (SSP) हमी देण्यासाठी कायदा करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. चर्चेच्या नव्या प्रस्तावावर विचार करूनच काही भाष्य केले जाईल, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले. खनौरी सीमेवर घडलेल्या घटनेबाबतही चर्चा करून पुढील रणनीती बनवू, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आतापर्यंत चारवेळा सरकारशी चर्चा केली, ती सर्व अनिर्णित राहिली.