राज्यभरातले सुमारे ८००० निवासी डॉक्टर आजपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जात आहेत . गेल्या काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अद्याप या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी पुन्हा आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.सायंकाळी ५ वाजल्यापासून संपाला सुरुवात होणार आहे.मात्र या संपामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तील निवासी डॉक्टर सहभागी होणार नसल्याचे बीएमसी मार्डने (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स)स्पष्ट केले आहे.
निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. त्यांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.तसेच ते प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, या डॉक्टर आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
दरम्यान, या मागण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल ‘मार्ड’ची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, कमिशनर डीएमईआर डायरेक्टर डीएमईआर, जॉइंट सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र, अद्याप या मागण्या मान्य झालेल्या नसल्यामुळे डॉक्टरांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.मार्डने दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.