पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (22 फेब्रुवारी) अहमदाबादमध्ये गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना भेटवस्तूही देण्यात आल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.
या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदी त्यांच्या या दौऱ्यात 22,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. यामध्ये गांधीनगर, अहमदाबाद, बनासकांठा, आनंद, महेसाणा, कच्छ, खेडा, भरूच, तापी, वडोदरा यांसारख्या जिल्ह्यांमधील रस्ते, रेल्वे, ऊर्जा, आरोग्य, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, शहरी विकास, पाणीपुरवठा, पर्यटन इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांचा या प्रकल्पांमध्ये समावेश असणार आहे.
तसेच पंतप्रधान मोदी सुरत महानगरपालिका, सूरत नागरी विकास प्राधिकरण आणि ड्रीम सिटीसाठी 5,040 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 41 विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 18 विकास प्रकल्पांचे उद्घाटन यांचा समावेश आहे.
840 कोटी रुपये खर्चून विकत घेतलेल्या 50 इलेक्ट्रिक बसेसही पंतप्रधान मोदी लॉन्च करणार आहेत. तसेच 597 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या तापी शुद्धीकरण प्रकल्पाच्या विविध घटकांचे आणि ड्रीम सिटी लिमिटेडच्या 49 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या दक्षिण विभागातील वडोदरा, नवसारी, भरूच, तापी, वलसाड, पंचमहाल, सुरत, छोटाउदेपूर, दाहोद आणि महिसागर यासह 11 जिल्ह्यांचा दौरा करतील जेथे ते 5,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.