मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेले लोकच आता आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. काल (21 फेब्रुवारी) आंदोलनात सहभागी असलेले अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यानंतर आता जरांगेंच्या सहकारी आणि मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक खुलासे करत जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी महाराष्ट्राला वेडे बनवले आहे, असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
यावेळी संगीता वानखेडे म्हणाल्या की, मनोज जरांगेंनी संपूर्ण महाराष्ट्राला वेडे बनवले आहे. अंतरवलीत दंगल घडली की घडवली गेली? याचा सरकारने शोध लावावा. सुरूवातीला मला मनोज जरांगे हा भोळा भाबडा माणूस वाटत होता, म्हणून मी आधी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे तेव्हा मी मनोज जरांगेंची बाजू घेऊन छगन भुजबळांना ट्रोल केले होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी जरांगेंचा विरोध करत आहे, कारण जरांगे कोण आहे हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हते.
पुढे संगीता वानखेडेंनी धक्कादायक खुलासा केला आहे. मनोज जरांगेंना शरद पवार यांचा फोन येत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत होते, म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. तसेच पुण्यात ज्यांनी मनोज जरांगेंचे बॅनर लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावले होते. शरद पवार जसे सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. शरद पवारच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, असा गंभीर आरोप वानखेडेंनी केला आहे.
मनोज जरांगे हे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त त्यांना एक फोन येत होता, त्यांनाच ते विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता. तसेच मी एक ते दीड महिन्यांपासून मनोज जरांगेंचा विरोध करत आहे, असेही संगीता वानखेडे म्हणाल्या.
दरम्यान, काल अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याच्या सर्व मिटिंग रात्री होत असतात. जेव्हा वाशीला आंदोलन पोहोचले होते त्या रात्री त्यांनी पुन्हा गुप्त मिटिंग केल्या होत्या. अधिसूचनेत सांगण्यात आले होते की, हे सोळा तारखेला लागू होईल. पण जरांगेची इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येऊन मला पाणी पाजावे. त्याला फक्त श्रेय हवे आहे. गरिबाला आरक्षण हवे आहे पण याला फक्त श्रेय आणि जेसीबीतून फुले हवी आहेत.
मनोज जरांगेंची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देवही पाया पडले. तुमच्या मुलांमध्येही इतका अहंकार? तुम्ही सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? तो माझ्यावर आरोप करतो की मी सरकार आणि भुजबळांचा माणूस आहे. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत त्याने सरकारला एकही पत्र स्वत: दिले नाही. रोज पलटी मारत असतो, असे आरोपही अजय महाराज बारसकर यांनी केले आहेत.