कर्नाटक राज्य सरकारने बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी विधानसभेत विधायक मंजूर केले असून आता राज्य सरकार उत्पन्नानुसार राज्यातील हिंदू मंदिरांकडून 5 ते 10 टक्के कर वसुल करणार आहे.
कर्नाटकात गेल्या वर्षी सत्तांतर होऊन सिद्धारामय्या यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार सत्तेत आले आहे.राज्य सरकारने बुधवारी विधानसभेत “कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि एंडोमेंट बिल 2024” बहुमताने मंजूर केले आहे . या विधेयकामुळे १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून १० टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे. तर १० लाख ते १ कोटी रुपये उत्पन्न असलेल्या मंदिरांना ५ टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाली असून या कृत्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येदियुरुप्पा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत एक्स पोस्टमध्ये म्हणले आहे की, “सिद्धरमय्या सरकार हिंदू विरोधी धोरणाचा अवलंब करून आपला खजिना भरू पाहत आहे. काँग्रेस सातत्याने हिंदू विरोधी धोरणाचा अवलंब करत आहे. आता काँग्रेसची नजर हिंदू मंदिरांच्या महसूलावरही गेली आहे. मंदिराकडून पैसे घेऊन आपली तिजोरी भरण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आलाय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.विशेष म्हणजे फक्त हिंदू धर्माच्या मंदिरांनाच लक्ष्य केले जात असून अन्य धर्माच्या धर्मस्थळांबाबत काँग्रेसने असा निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे.
विजयेंद्र येडीयुरप्पांच्या आरोपाला उत्तर देताना कर्नाटक सरकारचे मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, भाजप राजकारण करीत असून काँग्रेसनेच वर्षा वर्षे हिंदू हितांचे रक्षण केले आहे. काँग्रेसच हिंदूंची खरी हितरक्षक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे .