ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी राजीनामा दिला आहे. शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा पाठवला आहे. तसेच पक्षाला रामराम करत शिल्पा बोडखेंनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत.
शिल्पा बोडखे यांनी राजीनामा दिल्यानंतर हा पक्षासाठी हा मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. शिल्पा बोडखे यांनी राजीनाम्याबाबतची एक पोस्ट X वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र..माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा.”
पुढे शिल्पा बोडखेंनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आपण शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटत आहे.
शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.
मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या.
मला सोशल मीडिया या पदावर काम करायचे नाही असे पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.
जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद. पुढे कोणाचे असेल राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठिशी उभा राहणार नाही, असे शिल्पा बोडखे यांनी म्हटले आहे.