खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत त्यांचे नवीन घर बांधले आहे. त्यांनी 15 हजार स्क्वेअर फूट जागेत अलिशान असे घर बांधले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी आज (22 फेब्रुवारी) या नवीन घरात गृहप्रवेश केला. त्यांनी उज्जैनच्या पंडितांकडून त्यांची घराची पूजा केली आहे. तसेच स्मृती इराणी यांनी त्यांचे पती झुबिन इराणी यांच्यासोबत हवन-पूजन केले.
स्मृती इराणी यांनी डोक्यावर कलश घेऊन गृहप्रवेश केला. तसेच स्मृती इराणी यांनी 20 हजार लोकांना आमंत्रित केले असून आज संध्याकाळी त्यांनी मेजवानीचे आयोजन केले आहे. तसेच यावेळी मोठ्या संख्येने भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
विशेष सांगायचे झाले तर, स्मृती इराणी यांच्या घरी राम दरबारही आहे. सोबतच त्यांच्या घराच्या भितींवर रामलल्ला मंदिर आणि महर्षी वाल्मिकी यांची चित्रे देखील काढण्यात आली आहेत. तसेच स्मृती इराणी यांचे हे घर अमेठीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मेदन मावई गावात आहे.
दरम्यान, स्मृती इराणी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान अमेठीच्या जनतेला आश्वासन दिले होते की, खासदार झाल्यानंतर त्या अमेठीत घर बांधतील.