सोलापूर एमडी ड्रग्जप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पकडलेला मुख्य सूत्रधार फय्याज शेख (रा. वसई, जि. पालघर) हा केवळ दुसरीपर्यंतच शिकलेला आहे. कारागृहात असताना त्याला भेटलेल्या वेगवेगळ्या गुन्हेगारांच्या मदतीने त्याने ड्रग निर्मितीची माहिती घेतली आणि कालांतराने तो स्वत:च या धंद्यात उतरला. ओळख लपवून वेगवेगळ्या पाच राज्यात ड्रग निर्मिती करणारा फय्याज अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलाच. केवळ दुसरीपर्यंत शिकलेला फय्याज २००० सालापासून ड्रग निर्मितीच्या अवैध व्यवसायात आहे.
एका गुन्ह्यातील अटकेनंतर तो कारागृहात होता. त्यावेळी तेथील वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांमार्फत त्याने ड्रग निर्मितीची केमिस्ट्री समजून घेतली. त्यानंतर तो या धंद्यात उतरला आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश व राजस्थान या पाच राज्यातील ड्रगच्या गुन्ह्यांचा आंतरराज्य सूत्रधार बनला.लोकांच्या नजरेत येणार नाही अशी जागा तो निवडायचा. त्यासाठी तो बंद पडलेले कारखाने लक्ष्य करून ते भाड्याने घेऊन तेथेच ड्रगचे उत्पादन करायचा. त्यासाठी लागणाऱ्या टीमची जुळवाजुळव, कच्च्या मालाची उपलब्धता, या सगळ्या बाबी तो अगदी सहजपणे सांभाळायचा. दरवेळी तो ड्रग निर्मितीसाठी लागणारे लोक बदलायचा.नाशिकसह सोलापुरातील चिंचोळी, चंद्रमौळी एमआयडीसीतील ड्रग निर्मिती उघडकीस आल्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. मात्र, तो ओळख लपवून राहत असल्याने आणि कोणतीही संपर्काची साधने वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानच होते. मात्र, अखेर कलबुर्गीत तो पोलिसांच्या हाती लागला.