मी मुस्लीम असल्यामुळेच काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय झाल्याचा खळबळजनक खुलासा आमदार झीशान सिद्दीकी यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. मी फक्त मुस्लिम असल्यामुळेच युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही दोन वर्षे मला त्रास देण्यात आल्याचे सांगत मुस्लिम असणे हे काँग्रेसमध्ये पाप आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुंबई युवक काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच काँग्रेसचे सेक्युलरिजमही फेक असल्याचा थेट आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्याबरोबरच त्यांनी नावांसकट उबाठा गटाच्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले आहेत.
माझे वडील राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले, मात्र तरीही मी कॉंग्रेसमध्येच आहे हे मी वारंवार सांगितले होते तरी देखिल माझ्या विरोधात मुंबई प्रदेश युवक काँग्रेस पदावरुन हटवण्याची कारवाई केली गेली. असे त्यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात होती.