शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह मिळाले आहे. ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले आहे. याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले असून याबाबतची माहिती त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षाने X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन मी जी स्वप्राणाने, भेदुनि टाकिन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”, असे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या पक्षाने ट्विट करत म्हटले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1760714746230395024
निवडणूक आयोगाने गुरूवारी रात्री उशीरा शरद पवार गटाकडून दिलेल्या पर्यांयाचा विचार करत ‘तुतारी’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले आहे.