माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यापाठोपाठ आता भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचापादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 59 वर्षांचे होते.
राजेंद्र पाटणी हे देखील एकेकाळचे शिवसैनिक होते. 1997 ते 2003 पर्यंत ते शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला होता.
राजेंद्र पाटणी हे 2004 ते 2009 पर्यंत वाशीमच्या कारंजा मतदार संघात विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. पण 2009 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर 2011 मध्ये पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत राजेंद्र पाटणी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. नंतर पाटणी यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून कारंजा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. तसेच 2019 मध्ये पाटणी हे पुन्हा कारंजा मतदारसंघातून भाजप आमदार म्हणून निवडून गेले.