निवडणूक आयोगाने गुरूवारी रात्री उशीरा शरद पवार गटाकडून दिलेल्या पर्यांयाचा विचार करत ‘तुतारी’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या पक्षाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ या पक्षाचा उद्या (23 फेब्रुवारी) भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. हा सोहळा रायगडावर पार पडणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून शरद पवार हे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. तसेच उद्या रायगडावर शरद पवारांच्या तुतारीचा नाद घुमणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत. तसेच शरद पवरांच्या पक्षाकडून रायगडावर ‘तुतारी’ चिन्हाचे लाँन्चिंग करत लोकसभेसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांना बहाल केले होते. त्यामुळे शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हेच चिन्ह राहणार आहे.