पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. तसेच संत रविदास यांची जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींनी संत रविदास यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केले. आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले, रविदासजींच्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांचे त्यांच्या जन्मभूमीत स्वागत करतो.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, संत रविदासजीही मला पुन्हा पुन्हा त्यांच्या जन्मस्थानी बोलावतात. मला त्यांचे संकल्प पुढे नेण्याची आणि त्यांच्या लाखो अनुयायांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व गुरूंच्या अनुयायांची सेवा करणे माझ्यासाठी भाग्यापेक्षा कमी नाही.”
पुढे ते म्हणाले, “आज मला संत रविदासजींच्या नवीन पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. संत रविदास व्हिजनची पायाभरणीही आज झाली आहे. या विकास कार्यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.”
तसेच मी राजकारणात असो किंवा कोणत्याही पदावर असलो तरी मला संत रविदासजींच्या शिकवणीतून मार्गदर्शन मिळत असे. रविदासजींची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी माझ्या मनात भावना होती आणि आज देशाच्या इतर ठिकाणीही संत रविदासांशी संबंधित संकल्पांची पूर्तता होत आहे. रविदासजींच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी नवीन केंद्रेही स्थापन केली जात आहेत. काही महिन्यांपूर्वी, मला मध्य प्रदेशातील सतना येथे संत रविदास स्मारक आणि कला संग्रहाची पायाभरणी करण्याचा बहुमान मिळाला होता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.