आज सकाळी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले होते. तुतारी चिन्ह घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी किल्ले रायगडावर या चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला. किल्ले रायगडावर या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वानी तुतारी वाजवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवताना असणारा माणूस असे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. सुप्रीम कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत हे चिन्ह राहणार आहे. लवकरात लवकर चिन्ह मिळावं व निवणुकीसाठी ते वैध असावे यासाठी शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. तसेच आमदार अपात्रता प्रकरणात देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले असून, दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाने सर्वोच न्यायालयात दाद मागितली आहे.