एप्रिल मे महिन्यात देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधकांनी भाजपा सत्ते येऊ नये साठी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे तर, एनडीए पुन्हा एकदा सत्त्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपाने महाराष्ट्र्रात लोकसभेसाठी मिशन ४५ ची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत काही विशेष करण्याची शक्यता आहे. त्याचनुसार महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्याचे समजते. कोकणी आणि मराठी चेहरा असल्याचे राहुल नार्वेकरांच्या नावाला पक्षाने पसंती दिल्याचे समजते आहे. सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार आहेत. अरविंद सावंत हे तिथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र आता त्यांच्या विरोधात राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक लढतील असे चित्र दिसत आहे.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर हे भाजपाचे मुंबईतील विधानसभेचे सदस्य आहेत. तसेच ते पेशाने वकील असून सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दोन मोठे निर्णय दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपला निर्णय दिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. विरोधक या निर्णयांनंतर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.तर, दिल्लीमधून आलेला निर्णय राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवला अशी टीका विरोधक त्यांच्यावर करत आहेत. तर, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच मी निर्णय दिल्याचे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा यंदा अनेक विधानसभा सदस्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभेसाठी काही नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊन भाजपा नवीन नेतृत्व तयार करण्याचे प्रयत्न करेल व राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल. कारण, मागच्या वेळेस जिंकल्या तेवढ्या जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा महायुती राज्यात जिंकेल असा विश्वास भाजपचे राज्यतील नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.