सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजाणी न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभर आंदोलनाची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यातील गावागावांमध्ये रास्ता रोको करत, सगेसोयरे या अधिसूचनेची अमलबजावणी करावी याचे निवेदन देण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत रास्ता रोको व संध्याकाळच्या वेळेस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने जरांगे पाटलांना काही निर्देश दिले आहेत.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मानवोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र यामुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश न्यायालयाने जरांगे पाटलांना दिले आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारने घ्यावी असे कोर्टाने म्हटले आहे.
या याचिकेवरील सुनावणी नंतर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ”रस्ते बंद करा, लोकांना वेठीस धारा या ज्या सगळ्या बाबी आहेत, यात उच्च न्यायालयाने १९ नंबरचा पॅरेग्राफचा संदर्भ देत स्पष्टपणे सांगितलेले आहे. यामुळे जरांगे पाटील किंवा त्यांच्या लोकांना रास्ता रोको आंदोलन करता येणार नाही.” दरम्यान आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही कारवाई करू असे महाधिवक्त्यांनी कोर्टात सांगितले.
दरम्यान, आजपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितले आहे. तसेच उद्या अंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो मात्र आम्ही सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर ठाम असून, ती अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.