पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत, विकसित छत्तीसगड अंतर्गत ३४,४०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, कोळसा, उर्जा आणि सौर ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमात सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील झालेल्या विकासाचे कौतुक केले आहे. तसेच तकरी, युवक आणि नारी शक्ती यांच्या सक्षमीकरणातून विकसित छत्तीसगड उभारण्याचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन मोदींनी यावेळी केली. “आज आम्ही ‘विकसित छत्तीसगड’चा संकल्प घेऊन पुढे जात आहोत! भाजपने ते केले आहे आणि फक्त भाजपच त्यात सुधारणा करेल!”, पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ”छत्तीसगडमध्ये मेहनती शेतकरी, हुशार तरुणाई आणि नैसर्गिक संपत्ती आहे. विकासासाठी जे काही आवश्यक आहे, ते छत्तीसगडमध्ये पूर्वीही होते आणि आजही आहे. पण स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ देशावर राज्य करणाऱ्यांकडे फार मोठी दृष्टी नव्हती.” नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
”विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला खूप आशीर्वाद दिले आहेत. तुमच्या आशीर्वादाचेच फलित आहे की ‘विकसित छत्तीसगड’चा संकल्प घेऊन आम्ही तुमच्यामध्ये आहोत. भाजपने ते केले आहे, भाजपच त्यात सुधारणा करेल. याला आणखी पुष्टी दिली जात आहे”, असे मोदी म्हणाले. या प्रसंगी, पंतप्रधान मोदींनी NTPC चा लारा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, स्टेज-1 (2×800 MW) राष्ट्राला समर्पित केला आणि रायगडमध्ये NTPC च्या लारा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, स्टेज-II (2×800 MW) ची पायाभरणी केली.