पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत, विकसित छत्तीसगड अंतर्गत ३४,४०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, कोळसा, उर्जा आणि सौर ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहे. तसेच यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
घराणेशाहीवर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मोदींचे कुटुंब ही जनता आहे असे मोदी म्हणाले. शनिवारी ‘विकसित भारत, विकसित छत्तीसगढ’ कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस अजूनही परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या पलीकडे विचार करू शकली नाही. जे स्वत:च्या कुटुंबासाठी काम करतात ते तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा कधीच विचार करू शकत नाहीत. जे लोक आपल्या मुला-मुलींचे उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्य घडवण्यात व्यस्त आहेत ते कधीही तुमच्या गरजांकडे लक्ष देऊ शकत नाहीत किंवा तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकत नाहीत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमात सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील झालेल्या विकासाचे कौतुक केले आहे. तसेच तकरी, युवक आणि नारी शक्ती यांच्या सक्षमीकरणातून विकसित छत्तीसगड उभारण्याचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन मोदींनी यावेळी केली. “आज आम्ही ‘विकसित छत्तीसगड’चा संकल्प घेऊन पुढे जात आहोत! भाजपने ते केले आहे आणि फक्त भाजपच त्यात सुधारणा करेल!”, पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ”छत्तीसगडमध्ये मेहनती शेतकरी, हुशार तरुणाई आणि नैसर्गिक संपत्ती आहे. विकासासाठी जे काही आवश्यक आहे, ते छत्तीसगडमध्ये पूर्वीही होते आणि आजही आहे. पण स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ देशावर राज्य करणाऱ्यांकडे फार मोठी दृष्टी नव्हती.” नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.